top of page
web slide.jpg
जाहीरनामा 

रोजगार 

डाउनलोड  
3.png

     सध्याच्या युवा पिढीसमोर सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती बेरोजगारीची आहे. सतत युवकांच्या संपर्कात असल्याने मला या प्रश्नाची जाण असून त्याची तीव्रताही माहित आहे. हॉटेल सयाजीच्या माध्यमातून मी हजाराहून अधिक लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला आहे. आणि बेरोजगारी कमी करणे हे माझे टॉप प्रयोरिटीचे मिशन असणार आहे.

     आज कोल्हापुरात स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक युवक-युवती नव्या संकल्पना घेउन येत असतात. त्यांना प्रोत्साहित करुन त्यांच्या संकल्पनेला मुर्त स्वरुप देण्यासाठी शक्य ते सर्व सहाय्य करणं तसेच त्यांची शासकीय पातळीवर योग्य ती दखल घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोल्‍हापूरात साळोखेनगर येथे आम्‍ही कोल्‍हापूर इन्‍क्‍यूबेशन सेंटर (KIC) सुरू केले आहे. के.आय.सी.च्या माध्यमातून अप्सना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे मार्गदर्शन मिळेल, असे ध्येय मी ठेवले आहे. यासाठी "नासकॉम या संस्थेचे सहकार्य घेण्याचा माझा प्रयत्‍न आहे. अशा विविध स्टार्ट अप चालवणा-या लोकांना एकत्र आणून त्यांना विविध सुविधा व फायदे एकत्रितरित्या मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

     आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी पाहता कोल्हापूर महापालिकेच्यावतीने टेंबलाईवाडी इथं अद्ययावत आयटी पार्कची उभारणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे कोल्हापुरातील युवा पिढीला नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरातून जो ब्रेन ड्रेन होतोय ते रोखण्यासाठी आम्ही एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. आज कोल्हापुरात वाढलेल्या दळणवळणाच्या सुविधा व पंचतारांकित हॉटेलची उपलब्धता, मात्र त्यामानाने कमी असणारे खर्च यामुळे विविध बहुराष्‍ट्रीय कंपन्‍या आता कोल्हापूरात यायला तयार होतील, याची खात्री आहे. अशा विविध कंपन्यांना भेटून त्यांनी कोल्हापुरात यावे, यासाठी मी स्वत: त्‍यांना भेटणार आहे. यासाठी प्रोबेबल कंपन्यांचा सर्व्हे केला आहे. 

     त्याचबरोबर झोमॅटो, स्विगी, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या माध्यमातून रिटेल क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यासारख्या कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी अजून कशा उपलब्ध करुन देता येतील, हा माझा प्रयत्न असणार आहे. विशेषत: इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना स्टोरेज, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन्‍स याची गरज असते. या सुविधेसाठी कोल्हापूर ही योग्‍य जागा आहे. त्यामुळे, अशा सुविधा तयार करण्यावर माझा भर राहील.

     दक्षिण मतदारसंघातील जास्तीत जास्त युवक युवतींना नोक-या लावण्यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे. यासाठी आम्ही योग्य तो आराखडा निश्चित केला आहे. माझे अनेक मित्र व्यवसायिक आहेत, त्यांची अशी ओरड असते की चांगली माणसे मिळत नाहीत. त्याचवेळी हजारो युवक युवती बेरोजगार असतात. या दोन्ही मध्ये दुवा म्हणून काम करणारी व्यवस्था उभी करणे. गरज पडल्यास फिनिशिंग स्कुल/ स्किल कोर्सेस उभे करणे हे माझ्या कार्याच्‍या अग्रभागी आहे.

     स्पर्धा परीक्षा देणा-या युवक युवतींसाठी मतदारसंघातील प्रमुख ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सुसज्ज वाचनालयाची उभारणी करण्याचा मानस आहे. मात्र एक हजार जण तयारी करत असतील तर फक्त 10 च जणांना स्पर्धा परिक्षात यश मिळते. उरलेल्या लोकांच्या करिअरचा प्रश्न तयार होतो. मात्र, ही सर्व मुले-मुली सुद्धा उत्तम प्रकारे ट्रेन्ड असतात. अशावेळी या लोकांसाठी अल्टरनेट करिअरची सोय करणे. तशा संधी उपलब्ध करणे ही मी माझी जबाबदारी समजतो.

     नागरीकांना पायाभूत सुविधा मिळवून देणे हा माझा पुढील पाच वर्षाचा अजेंडा असेलच, पण 2024 च्या  निवडणूकीत 2019 ते 2024 या पाच वर्षात किती लोकांना आपण नोक-या लावल्या याचे रिपोर्ट कार्ड मी सर्वांसमोर ठेवणार आहे.

उद्योग

डाउनलोड  
4.png

     कोल्हापूर हे पहिल्यापासून फौंड्री क्षेत्रात अग्रेसर आहे. फौंड्री क्षेत्रातील उत्पादनांची निर्यात जवळपास साडे चारशे कोटी रुपयांपर्यंत आहे. जगातल्या प्रत्येक वाहनामध्ये कोल्हापूरात तयार केलेला एखादा पार्ट सापडतोच अशी स्थिती आहे. अशा या फौंड्री उद्योगाला चालना देण्यासाठी आम्ही फौंड्री क्लस्टरची स्थापना केली. या क्लस्टरच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना अधिक सक्षम करणे हाच उद्देश होता. भविष्यात या उद्योगांना अधिक चालना कशा पध्दतीने देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांची संकल्पना जगभरात वाढत आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी भविष्यात ही वाहने सक्तीची केली जातील असा कयास आहे. त्यांचे डिझाईन हे आताच्या गाड्यांपेक्षा पूर्ण वेगळे आहे. या बदलाला आपला फौंड्री उद्योग तयार राहावा यासाठी मेकॅट्रोनिक्स सारख्या विषया मध्ये उत्तम मनुष्यबळ तयार तयार करण्यासाठी या इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे या इलेक्ट्रीक वाहनांच्या पार्टचे उत्पादन कोल्हापूरातच करता येणे शक्य होईल. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांना लागणारी सर्व इकोसिस्टिम जसे की चार्जर वगैरे साठीचे तंत्रज्ञान कोल्हापुरात आणावे लागेल. या सर्व गोष्टीना लागणारे तंत्रज्ञ तयार करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी मी सरकार दरबारी सतत पाठपुरावा करेन. कोलंबस वा बर्लिन ह्या या क्षेत्रातील प्रगत गावांसोबत सिस्टर सिटी करार करता येईल का याबद्दल माझे प्रयत्न सुरु आहेत.

     त्याचबरोबर उद्योजकांसाठी वीज दरवाढ हा विषय गंभीर बनला आहे. ही उद्योगवाढीची वीज दरवाढ कमी करुन सवलतीच्या दरात वीज कशी देता येईल हा प्रयत्न राहील. कोल्हापूर जिल्हा वीज बिल भरणा करण्यात 100 टक्के आघाडीवर आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूरात वीजचोरी किंवा वीजगळती खूप कमी आहे. त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करुन वीज दरवाढ कमी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

शिक्षण

डाउनलोड 
2.png

     शिवाजी विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात लौकीकास पात्र काम केले आहे. पण कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय पातळीवरची एकही संस्था नाही. सह्याद्री घाटमाथ्यावर अनेक प्रकारची जैव विविधता आणि औषधी वनस्पती आहेत. त्यावर संशोधन करणारी संशोधन संस्था सुरु करण्याला माझे प्राधान्य राहील. यामुळे कोल्हापूरचे नांव शैक्षणिक क्षेत्रात जगाच्या पातळीवर ठळक होईल. कोल्हापूर हे कलापूर आहे. त्यामुळे कलेवर आधारित शिक्षण देणारी जागतिक दर्जाची शिक्षण संस्था आपल्याकडे उभी राहिली पाहिजे असे मला वाटते. विविध क्षेत्रातील संस्थांचे नोडल सेंटर्स कोल्हापुरात असावे यासाठी सुद्धा मी सतत प्रयत्न करेन. विविध संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न करेन. समाजातील शेवटच्या घटकपर्यंत, माफक आणि रोजगारक्षम शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न करणार. महाविद्यालये व शाळांमधील प्राध्यापक आणि कर्मचा-यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.

     २००९ ते २०१४ या काळात ५५ हजार पोलीस भरती झाली (दरवर्षी ११ हजार प्रमाणे) २०१३ साली MPSC च्या ६९ परीक्षा घेण्यात आल्या ५२ आठवड्यात. २०१८ साली ६९ जागांसाठी राज्यसेवा परीक्षेचे जाहिरात काढली गेली. गेल्या ३० वर्षातील सर्वात कमी जागांसाठी मागणी दीड वर्षात MPSC ला पूर्ण वेळ अध्यक्ष नव्हते,आता अध्यक्ष आहेत पण सदस्य नाहीयेत. मेगाभरतीच्या मोहजाळात तरुणांचे २ वर्षे वाया गेली अशा सर्व युवक-युवतींचे हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.. एमपीएससीच्या परिक्षेसंदर्भात मुलांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

आरोग्य

डाउनलोड  
5.png

     पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नावाने कार्यरत आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून ९७० आजारांवर उपचार केले जातात. यापुढे या योजनेत आणखी जादा आजारावरील उपचार समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच रुग्णांच्या विविध तपासण्याही यामध्ये समाविष्ठ करण्याचा माझा प्रयत्न राहील. विशेषत: महिलांमध्ये येणारे हिमोग्लोबीन डीफिशिअन्सी व इतर सहज लक्षात न येणा-या आजाराची तपासणी व सुयोग्य उपचार यावर माझा विशेष भर राहील. याशिवाय तरुणाईच्या मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. मोबाईल अडिक्शन व गेमिंग मुळे होणारे परिणाम होऊ नयेत यासाठी विशेष काम करणार आहे.

जेष्ठ नागरीक

डाउनलोड  
6.png

     जेष्ठ नागरिकांना एसटी पास सवलत देण्यासाठी वय वर्षे 65 ची मर्यादा कमी करुन ती 60 वर्षे केली आहे. त्याच धर्तीवर शासनाच्या श्रावणबाळ व अन्य योजनांसाठीसुध्दा 60 वर्षे ही वयोमर्यादा करुन जेष्ठ नागरीकांना सर्व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावागावात जेष्ठ नागरीकांसाठी बगीचा आणि विरंगुळा केंद्र सुरु करण्याचा मानस आहे.

     नोकरीनिमित्त मुले बाहेर असल्याने अनेक जेष्ठ नागरीकांना आधार देण्यासाठी घरी कोणीच नसते. ते एकटे असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना आधार देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणार आहे. ज्या लोकांच्या पेन्शन काही कारणास्तव बंद झाल्या आहेत त्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भारतातील काही शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मॉडेल वसाहती उभ्या राहिल्या आहेत. त्यांचा अभ्यास करुन तशा काही वसाहती शहरात उभ्या करता येतील का याचा फिजिब्लिटी स्टडी करणार आहे.

महिला

डाउनलोड  
7.png

     महिला बचतगटांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महिला गृह उद्योगातून महिलांना रोजगार देण्याकडे कल असेल. महिलांसाठी स्किल ट्रेनिंग, ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून स्किल बिल्डींगकडे विशेष लक्ष देणार आहे. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे, रोजगार उपलब्ध करुन देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांच्या सहभागातून ग्रामीण भागात सामुदायिक शेतीच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादित करणे आणि त्याला मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून महिलांच्या उत्पादनांना उत्तम मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्‍याचा माझा विचार आहे. तसेच उच्चशिक्षित महिलांसाठी घरबसल्या किंवा पार्ट टाईम करायचे उदयोग कोणते याबद्दल विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन देणार.

दिव्यांग व्यक्ती

डाउनलोड  
11.png

     शासकीय नोकरीत दिव्यांग बांधवांसाठी 3 टक्के आरक्षण लागू आहे. हे आरक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात 100 टक्के लागू केले आहे की नाही? यामध्ये लक्ष घालणार आहे. तसेच यापुढे होणा-या शासकीय नोकरभरतीत या आरक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना नोकरी मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरात दिव्यांगासाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार आहे. शहरातील महत्वाची ठिकाणे दिव्यांग फ्रेंडली होतील यासाठी विशेष निधी खर्च करायचा माझा मानस आहे.​ दरवर्षी मिळणार २ कोटी आमदार फंडातील ५% म्हणजेच १० लाख रुपये दिव्यांगासाठी खर्च करणे नियम आहे, दरवर्षी हे १० लाख रु. दिव्यांगासाठी मी खर्च करेन.

कला

डाउनलोड  
12.png

     कलानगरी ही ओळख असलेल्या कोल्हापूरला कला क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. मात्र याच कलानगरीत अद्ययावत शिक्षण आणि सुविधांची वाणवा असल्याने या क्षेत्रात काम करणा-यांच्या कौशल्याला संधी मिळत नाही. यासाठी लागणारे व्हीएफएक्स तंत्रज्ञान, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, व्हिडीओ एडीटींग यासारखे कौशल्य शिक्षण कोल्हापूरात मिळत नाही. त्यासाठी अनेकजण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातात. चित्रनगरी हा आपला पाया आहे. या चित्रनगरीत या विविध सुविधा देउन कलाकारांना वाव देणार आहे. त्यामुळे युवक युवतींना आणि या क्षेत्रात काम करणा­या लोकांना कोल्हापूरातच रोजगार मिळेल. कोल्हापूरचे शान असणारी कोल्हापूर चित्रनगरी ही दक्षिण मतदारसंघात येते. या चित्रनगरीचा जास्तीत जास्त वापर व्हावा असा प्रयत्न मी करणार आहे.  आजकाल च्या जगात शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांची चलती आहे. अशा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अनुदान वा तत्सम मदत देता येउ शकेल का याबद्दल मी प्रयत्न करणार आहे.

     कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करुन शक्य त्या अत्याधुनिक सोई, सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान पुरवण्यासाठी प्रयत्न करणार. शहरात सुसज्ज नाट्यगृहाची आणि खुला मंच उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्थानिक कलाकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

क्रीडा

डाउनलोड  
13.png

     खाशाबा जाधव, वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत, सुरज देसाई, राही सरनोबत, ऋचा पुजारी, अनिकेत जाधव, स्नेहल बेंडके, रेश्मा माने, शैलजा साळोखे, अनुजा पाटील यासारख्या नामवंत खेळाडूंनी कोल्हापूरचे नांव क्रीडा क्षेत्रात सातासमुद्रापार नेले आहे. कोल्हापूरची ही ओळख जपण्यासाठी कोल्हापूरातील क्रीडा संकुलाचा विस्तार करुन ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून कलानगरी म्हणून ओळखल्या जाणा­या कोल्हापूरला क्रिडानगरी हा बहुमान मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनासाठी 4 कोर्ट असणारा बॅडमिंटन हॉल कोल्हापूरात उपलब्ध नाही. त्यामुळे असा 4 बॅडमिंटन कोर्ट असणारा हॉल उभे करण्याला माझे प्राधान्य राहील. तसेच गावागावातील व वॉर्डातील क्रीडांगणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पर्यावरण

डाउनलोड  
15.png

     सध्या पर्यावरणाचे रक्षण करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यासाठी दरवर्षी पाच हजार प्रमाणे पाच वर्षात 25 हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे. प्रत्येक वॉर्डात आणि गावात योग्य त्या ठिकाणी दरवर्षी 75 झाडे लावून त्याला विशिष्ट क्रमांक देवून त्याची देखभाल करणार असून ती 100 टक्के जगविण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये ज्यादा ऑक्सीजन देणा­या आणि दहा फूटांपेक्षा अधिक उंचीचे वड, पिंपरणी, कडुनिंब, मोहगणी, सातवीन, आपटा, पिंपळ, कांचनबहावा, शेंदरी, पामच्या विविध जाती यांचा समावेश असेल. वैभवटेकडी, गिरगाव, कात्यायनी, पुईखडी याठिकाणच्या डोंगररांगांवर वनराई फुलविणार आहे. आज फ्रेंडस ऑफ ऋतुराजच्या माध्यमातून हजारो तरूण माझ्या सोबत जोडले गेले आहेत. या प्रत्येकाने एका झाडाची 5 वर्षे जबाबदारी घ्यायचे ठरवले आहे. याशिवाय एअर क्वालिटी व वॉटर क्वालिटी यावर काम करण्यासाठी एका विशेष टास्क फोर्स ची निर्मिती करण्यात येणार आहे. जे सतत पर्यावरण पूरक जीवनशैली साठी काम करत राहतील.

शेती

डाउनलोड  
16.png

     नदीकाठच्या क्षेत्राला महापुराचा फटका नेहमीच बसतो. वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट आणि कोईमतूरच्या रिसर्च इन्स्टिटयुटच्या माध्यमातून पाउस धार्जिणे बियाणे तयार करता येईल का? असे प्रयोग आंबोलीच्या सेंटरवर सुरु आहेत. त्याचाही अभ्यास करुन हे बियाणे शेतक-यांपर्यंत पोहचविणार आहे. शेतीमध्ये सध्या खताचे दर गगनाला भिडले आहेत. या परिस्थितीत उत्पादन खर्च आणि मिळणारी रक्कम यात फार मोठी तफावत आहे. त्यामुळे सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देणार आहे. ठिबक सिंचनाच्या अनुदानात वाढ करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. माती परीक्षण करुन त्यावर आधारित पीकपद्धती घेण्यासाठी शेतक-यांना प्रेरित करणार आहे. तसेच आंतरपिके घेऊन उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतक-यांचे प्रबोधन करणार आहे. ज्या प्रमाणे साखर कारखाना शेतात येऊन ऊस नेतो आणि ती रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा होते, त्याच धर्तीवर शेतक-यांच्या बांधावरून भाजीपाला खरेदी करून तो मार्केटमध्ये विक्री करणे आणि त्यातून मिळणारी रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तरूण शेतक­यांना एकत्रीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व करण्यासाठी प्रत्येक गावात एक शेती मित्र तयार करणे व त्याद्वारे सतत नवीन बदल लोकांपर्यंत पोहोचवणे असे प्लॅनिंग करत आहे.

वैचारिक वारसा

डाउनलोड  
17.png

     कोल्हापूर हे कायमच पुरोगामी विचारांचे माहेरघर ठरलेले आहे. राजर्षी शाहू महाराजांपासून ते अगदी एन. डी. पाटील, गोविंद पानसरे पर्यंत अनेक श्रेष्ठ लोकांनी कोल्हापूरला वैचारिक क्षेत्रात अग्रेसर ठेवले होते व आहे. वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी बेंगलोर व पुण्याच्या धर्तीवर "कोल्हापूर इंटरनॅशनल सेंटर" सुरू करण्‍याची संकल्पना आहे. या सेंटरद्वारे विचार मंथन चालू ठेवणे, रिसर्चला प्रोत्साहन देणे, कोल्हापूरचा इतिहास जपणे अशी विविध कामे होत राहतील. कोल्हापूर बाहेर असणारे जगभरचे ब्रँड कोल्हापूरचे आंबसिडर यात मदत करतील अशी मला खात्री आहे.

पर्यटन

डाउनलोड  
14.png

     गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या पर्यटनात वाढ झाली आहे. मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. इथे आलेल्या पर्यटकाला जास्तीत जास्त वेळ कोल्हापुरात घालवण्यासाठी "हेरिटेज प्लॅन" बनवणे. याशिवाय कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, रंकाळा, पन्हाळा- जोतिबा वगळता इतर काही पर्यटन स्थळांचा विकास करणे माझ्या डोळ्यासमोर आहे यामध्ये कळंबा तलाव, टेंबलाईवाडी अशा ठिकाणांचा समावेश आहे. कोल्हापुरात असणारा उत्तम निसर्ग व विमान-रेल्वेची सेवा यामुळे  कोल्हापूर हे "मेडिकल टुरिझम" साठी सुयोग्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. कोल्हापुरात  ट्रेन्ड टुरिस्ट गाईड असावेत यासाठी मी प्रयत्न करीन त्याशिवाय कोल्हापुरात पर्यटकांसाठी मार्गदर्शन केंद्राची निर्मिती करणार. कोल्हापुरात येणा-या पर्यटकांसाठी माफक दरात निवास, जेवण आणि वाहतूक व्यवस्था सुरु करण्याचा मानस. पर्यटनपूरक सुविधांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार

वीज

डाउनलोड  
18.png

     शेतकरी बांधवांसाठी 24 तास आणि माफक दरात वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार. ग्रामीण भागात वारंवार खंडित होणा-या वीज पुरवठ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. नागरिकांच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये माफक दरात सोलर पॅनल बसवण्याची मोहीम राबवणार. मतदारसंघातील खराब झालेल्या विद्युत वाहिन्या, जुने पोल, ट्रान्सफॉर्मर बदलून अंडर ग्राउंड केबल टाकण्यासाठी प्रयत्न करणार.

रस्ते बांधणीचे धोरण

डाउनलोड  
1.png

    शहरातील खराब रस्ते नव्याने करुन ते टिकाऊ करण्याचा प्रयत्न करणार. आवश्यक त्या ठिकाणी फुटपाथ आणि गटर्स ची बांधणी. प्लास्टिकमुक्तीचे धोरण अवलंबून  रस्ते बांधणीमध्ये टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रयत्न करणार.

पाणी

डाउनलोड  
19.png

    शहर आणि मतदारसंघातील स्थानिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस. रेन हार्वेस्टिंग करण्यासाठी लोकांना प्रबोधन आणि सहकार्य करणार. पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना, प्रबोधन यावर भर देण्याचा प्रयत्न करणार. लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार 

न्यायालय

डाउनलोड  
20.png

     33 वर्षे सुरु असलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार. इतर राज्याप्रमाणे नवोदित वकिलांना स्टायपंड, शहरात सुसज्ज आणि अद्ययावत लायब्ररी उभारणे तसेच वकिलांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.

वाहतूक

डाउनलोड  
22.png

     गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुमजली पार्किंग चा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार. नियोजनबद्ध आराखडा तयार करुन शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी  प्रयत्न करणार. वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणार. शहरांतर्गत वाहतुकीसाठी केएमटी सुविधेला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार.

bottom of page