top of page
Search

वाढदिवसाच्या शुभेच्छा आदरणीय आई!

आज आईंचा वाढदिवस... प्रेम, वात्सल्य आणि नदीप्रमाणे शांत आणि निर्मळ मनाच्या आईंची वेगवेगळी रूपे आम्ही आजपर्यंत अनुभवतोय.

पप्पांच्या प्रत्येक निर्णयामध्ये योग्य सल्ला देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणाऱ्या.. आम्हा भावंडांना हॉस्टेलवर ठेवल्यावर डोळ्यात पाणी येणाऱ्या.. कुटुंबातील सर्व नाती जबाबदारीने आणि प्रेमाने जपणाऱ्या..कितीही कठीण प्रसंग असला तरी खंबीर राहणाऱ्या... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला घडवितांना मला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पुढे जायला नेहमीच पाठबळ देणाऱ्या, माझी सपोर्ट सिस्टीम म्हणजे आई.

मला आठवतंय, कोल्हापुरात शाहू विद्यालयामध्ये तिसरीपर्यंतचे माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर पप्पांनी मला पुण्यातील बिर्ला स्कूलमध्ये होस्टेलसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आईंशी चर्चा करून घेतला होता. पण, ज्यावेळी मला सोडायला आई पप्पा पुण्याला आले, त्यावेळी आईंच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. पण, यानंतर ज्या ज्या वेळी त्या मला भेटायला पुण्याला यायच्या, त्या त्या वेळी निरोप घेताना माझ्या काळजीपोटी त्या डोळ्यात पाणी आणू द्यायच्या नाहीत. स्कूलमधून गेल्यानंतर त्या मी त्यांच्यापासून लांब राहतोय या विचाराने त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी यायचे. आता माझे लग्न झाले आहे, मी आमदार झालो आहे, तरीसुद्धा मी आजारी असल्यास माझ्या जवळ येऊन बसतात. डॉक्टरांनी नेमकी कोणती औषधे दिलेली आहेत? मी ती वेळेवर घेतली आहेत का? या गोष्टींची माहिती त्या घेत असतात. मी लहानाचा मोठा झालो असलो तरी, एखाद्या आईसाठी तिचे मुले कधीच मोठी होत नाहीत, याचा प्रत्यय आम्हाला नेहमीच येत असतो.

ज्यावेळी शिक्षण संस्था सांभाळण्याची जबाबदारी पप्पांच्यावर आली, त्यावेळी तो काळ थोडा अडचणींचा होता. या कठीण काळामध्ये पप्पा प्रत्येक गोष्टीबाबत आईंशी चर्चा करत असत. आणि यावेळी योग्य निर्णय घेण्यामध्ये आईंचा महत्वाचा सहभाग असायचा. त्यामुळे पुढील काळात सुद्धा कोणताही महत्वाचा निर्णय घेताना पप्पांची आईंशी चर्चा नेहमीच ठरलेली असायची आणि आता सुद्धा असते.

या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सदैव प्रसन्न आणि हसतमुख स्वभावामुळे आमच्या कुटूंबातील सर्व नातेवाईक, पै-पाहुणे यांच्याशी आईंनी खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहे. माझ्या तसेच पृथ्वीच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये आईंचा मोलाचा वाटा आहे. बिजनेस असो वा राजकारण, मला जे आवडते ते करायला देण्यात आईंनी नेहमीच मला सपोर्ट केला आहे.

माझे लग्न ठरल्यावर, आईंना खूप आनंद झाला होता. मला आणि सौ. पूजा यांना लग्नामध्ये ज्या गोष्टी करायची इच्छा होती, त्या सर्व गोष्टी त्यांनी आनंदाने करू दिल्या. लग्नानंतर सौ. पूजा ही 'माझी सून नसून मुलगीच आहे' असे त्या मानतात. आपल्या मुलीप्रमाणे पूजाच्या सर्व आवडी-निवडी लक्ष घालून पूर्ण करत असतात. माझा मुलगा अर्जुनच्या जन्मानंतर एक आज्जी म्हणून त्यांचे वेगळे रूप आम्ही अनुभवत आहोत.

आमच्या परिवारातील सर्वांच्या आयुष्यामध्ये महत्वाचे स्थान असणाऱ्या आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments
bottom of page