कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि संबंधीत अधिकारी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे आढावा बैठक घेतली.
सध्या जिल्ह्यात 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. १ मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन ती कमी करण्यासाठी आणि कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना कशा पद्धतीने लस देता येईल याबाबत नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी, सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्यांनी गावामध्ये कोव्हीड सेंटर उभे करून स्थानिक पातळीवरच जास्तीत जास्त रुग्णांना पुरेश्या आरोग्य सेवा पुरवाव्यात तसेच गावातील युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृतीकरून पात्र नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावेत असे आवाहन यावेळी केले.
याचसोबत, १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे, त्यामुळे अशा वेळी गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळले जावे यासाठी 'ई-टोकण सिस्टम'चा वापर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे त्या गावात एक दिवसीय कॅम्प आयोजित करून संपूर्ण गावाचे लसीकरण पूर्ण करावे, यासाठी मदत करणाऱ्या खासगी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे लागले तरी ते घेणे बाबतच्या सूचना यावेळी दिल्या.
मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या गावांमध्ये परप्रांतीय नागरिकांचे सुद्धा लसीकरण कसे करता येईल यासंदर्भात नियोजन करण्याची सूचना यावेळी केली.
या बैठकीला, करवीर तहसीलदार शीतल मुळे, गटविकास अधिकारी जयवंत उगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुणाजी नलावडे, तसेच सर्व गावाचे सरपंच, ग्रामसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments