कसबा बावडा येथील कष्टाळू तरुण संभाजी हराळे यांच्या "रावजी" या चहाच्या स्टार्टअप ला भेट देऊन चहाचा आस्वाद घेतला.अवघ्या एक वर्षाच्या काळात मुंबई, पुणे, ठाणे, सांगली जिल्ह्यात 48 ठिकाणी रावजी चहाच्या फ्रॅंचायजी त्यांनी दिलेल्या आहेत.
लहानपणापासून धडपडी असणाऱ्या संभाजी यांनी एमआयडीसी मध्ये हेल्पर त्याचबरोबर रिक्षा ड्रायव्हर, ॲम्बुलन्स ड्रायव्हर अशी वेगवेगळी कामे केली. पण नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपण स्वतः एखादा छोटा व्यवसाय सुरु करावा, असा विचार खूप वर्षे त्यांच्या मनात सुरु होता. पण नेमकं काय करायचं ? याची वाट सापडत नव्हती.
अखेर त्यांचे भाऊ रवींद्र यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीच्या चहाचा आस्वाद लोकांना देता येईल ,अशा पद्धतीची चर्चा त्यांनी केली. मुळात संभाजीना जेवणातील विविध पदार्थ तयार करायची आवड आहे. या आवडीतून त्यांनी वेगवेगळे 5 ते 6 पदार्थ वापरून स्वतः चहा मसाला तयार केला.घरी तीन महिने या पदार्थांचे प्रमाण बदलून चहा कसा होतोय , याची ट्रायल घेतली.आणि त्यानंतर रावजी चहा या नावाने कसबा बावडा येथील कवडे गल्लीजवळ एका केबिनमध्ये हा चहा विकायला सुरुवात केली.हा चहा लोकांच्या पसंतीला उतरल्याने काही दिवसांमध्ये कसबा बावडा रस्त्यावरील कोर्टाच्या इमारतीसमोर एका गाळ्यामध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या चहाची चव आवडली. आणि आश्चर्य म्हणजे रावजी चहाच्या अवघ्या एक वर्षात 48 ठिकाणी फ्रॅंचायजी सुरू झाल्या आहेत.
स्टार्टअप च्या युगात संभाजी यांनी एक वेगळी यशस्वी वाट कशी शोधावी, याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. या धडपडी तरुणाच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
आमदार ऋतुराज पाटील
Comments