आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तसेच लसीकरणाबाबत बैठकीत माहिती जाणून घेतली. या बैठकीत खालील उपायोजना सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१. महाराष्ट्रातील विदर्भातील वाढत्या रूग्ण रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्कतेने काम करत असून जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असणाऱ्या सर्व साधनसामुग्री यंत्रणा कार्यान्वित करून त्या सुस्थितीत ठेवण्याबाबतचे नियोजन करावे.
२. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक कोव्हिड काळजी केंद्र सुरू करता येईल याबाबत तयारी ठेवावी. पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावरही भर द्यावा. तसेच, प्रमुख शहरातील खासगी लॅबवर लक्ष द्यावे.
३. राज्य सरकारने सुरु केलेल्या लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या फ्रंटलाईन वर्कर्सचे येत्या शुक्रवारपर्यंत 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.
४. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल यंत्रणेने कठोर कारवाई करण्याबाबत संबंधीतांना सांगितले असून 'मास्क नाही, प्रवेश नाही' ही मोहीम जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा करूयात, कोरोनाचा प्रसार रोखूयात. आतापर्यंत आपण सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे, यापुढेही करूया, त्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगूया.
या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे आदी उपस्थित होते.
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर
Comments